पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण शक्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही. मात्र, मूल्यमापन, नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आव्हान नाही, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे आयोजित परिषदेचे उद्घाटन मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयएम अहमदाबादचे संचालक प्रा. भारत भास्कर, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, प्रा. रवीकुमार जैन, डॉ. चंदन चौधरी, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत, संचालक डॉ. राजश्री पिल्लई या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – ३४ हजाराच्या औषधांसाठी १४ लाख गमावले

मजुमदार म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केवळ धोरण नाही, तर देशाच्या शिक्षणाच्या परिवर्तनातील मैलाचा दगड आहे. त्याद्वारे देशातील शिक्षण व्यवस्था आणि शैक्षणिक परिसंस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहेत. बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे धोरण पथदर्शी ठरणार आहे. तसेच देशाला नवंसकल्पना आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ‘ग्लोबल हब’ म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता केवळ संकल्पना राहिलेली नाही, तर परिवर्तनाचे साधन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात शिक्षण देणे शक्य होऊ शकेल. विद्यार्थ्यांमधील उणीवा, बलस्थाने हेरून त्यांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण देता येईल. ’

अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालयात एआय लॅबद्वारे विद्यार्थ्यांना विदा विश्लेषण, कोडिंग आणि रोबोटिक्स शिकवले जात आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारसंधींसाठी रोजगारक्षम करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबरोबरच त्याचा नैतिकतेने वापर करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून बुद्धिमान देश घडवता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – सहकारी गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशनाला सुरुवात, महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थेशी संबंधित विविध प्रदर्शन तसेच मार्गदर्शन

पीआयबीएमने आजवर आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवावर भर दिला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विविध क्षेत्रात वापरली जाणार आहे. त्यामुळे नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे, असे रमणप्रीत यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister of state for education sukant majumdar talk on artificial intelligence and teachers pune print news ccp 14 ssb