पुणे : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. याच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आपली भूमिका मांडत विरोधकांवर टीका केली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी जुनीच आहे. चार वेळा मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या शरद पवार यांनी हे आरक्षण मिळू दिले नाही, असा आरोप राज्यमंत्री मोहोळ यांनी केला आहे. राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेले आणि न्यायालयात टिकलेले मराठा आरक्षण केवळ महाविकास आघाडीमुळे गेले, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. मराठा समाजाला महायुती सरकारच न्याय देईल, असा दावाही मोहोळ यांनी केला.
भाजपच्या माध्यम केंद्रात मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये ते बोलत होते. राष्ट्रीय माध्यम प्रमुख के. के. उपाध्याय, प्रदेश उपाध्यक्ष व माध्यम प्रमुख माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, संजय मयेकर यावेळी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, अनेक वर्षे सत्ता भोगलेल्यांनीच आता मराठा आरक्षणाचा राजकीय वापर सुरू केला आहे. चार वेळा मुख्यमंत्रिपदी बसलेल्या शरद पवार यांनी मराठा आरक्षण मिळू दिले नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात केवळ महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच टिकू शकले नाही. मराठा आरक्षणासाठी महायुती सरकार सकारात्मक असून ओबीसींचा हक्क अबाधित राखून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल.
हेही वाचा – विधानसभा निवडणुकीसाठी सकल ब्राह्मण समाजाने घेतला मोठा निर्णय !
पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी ४२ जागा महायुतीकडे आहेत. विधानसभेत निवडणुकीत ४२ पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला
कारखान्यांंना दिलेल्या निधीची चौकशी
केवळ सहकार टिकावा या हेतूने केंद्र सरकारने हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला ३०० कोटी रुपये दिले आहेत. दिलीप देशमुख यांच्या कारखान्याला ९०० कोटी, जयंत पाटील यांच्या कारखान्याला ३०० कोटी दिले आहेत. मात्र, या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला नसेल तर त्यांची चौकशी नक्कीच होईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
माध्यम केंद्राचे उद्घाटन
भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी शुक्रवार पेठेत माध्यम केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.
© The Indian Express (P) Ltd