पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी स्वतंत्र दालनाची मागणी, त्यासाठी माजी अधिकारी असलेल्या वडिलांचा वशिला, स्वतंत्र दालन, वाहन, शिपाई मिळत नसतानाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, तसेच आलिशान खासगी गाडीवर लाल दिवा लावणे. या कारनाम्याबाबत पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी थेट तक्रारींचे सविस्तर पत्र राज्य शासनाला मागील आठवड्यात पाठवले आहे. पत्राची राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन पूजा खेडकर यांची वाशिमला बदली केल्याचा आदेश काढला. त्यानंतर देखील पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती सादर करून प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अधिकारी वर्गात चांगलीच चर्चा झाली आहे.
या सर्व प्रकरणाबाबत केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता, पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा घेतला असल्यास, ते अंत्यत गैर आहे. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तसेच त्यामध्ये पूजा खेडकर दोषी आढळल्यास त्यांना पदावरून हटविले पाहिजे, अशी भूमिका मांडली.
हेही वाचा – शरद पवारांच्या सभेची पिंपरीत जोरदार तयारी; अजित पवारांचा एक गट शरद पवार गटात जाणार!
वाहतूक नियमांचे पालन न केल्याने २१ हजारांचा दंड
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सेवेत होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी या आलिशान गाडीमधून या सेवेदरम्यान प्रवास केला. त्यावेळी वाहतूक नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने त्यांना २१ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तो दंडदेखील वसूल केला जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.