शिरूरचे खासदार अमोल कोल्हे काम करत नाहीत, कामाची जबाबदारी घेत नाहीत आणि संबंधित काम झाल्यानंतर केवळ श्रेय घेतात, अशी टीका केंद्रीय जलशक्ती व अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी गुरुवारी केली. जर कोणी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागतच करू, असेही पटेल यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा >>>हृदयद्रावक: शाळेत चाललेल्या माय- लेकाचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा मृत्यू
सांसद प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते. ते म्हणाले, ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच लढायची संधी मिळाली नाही. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे आणि स्थानिक नागरिकांची देखील तयारी आहे. त्याकरिता संघटनात्मक पातळीवर जी कामे करायची आहेत, ती आम्ही करत आहोत. या ठिकाणी उमेदवार कोण हे पक्षाच्या केंद्रीय पातळीवरून ठरेल. शिरूर जिंकण्यासाठी २०२४ ची निवडणूक आम्ही लढवू. खासदार कोल्हे काम करत नाहीत, कामाची जबाबदारी घेत नाहीत आणि संबंधित काम झाल्यानंतर केवळ श्रेय घेतात, अशी भाजपची कोल्हे यांच्याबाबत धारणा आहे. त्याउपर जर कोणी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागतच करू. शिरूरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद चांगली आहे. मात्र, येथील आदिवासी भागात केंद्राच्या योजना पोहोचवण्यासह संघटनात्मक काम करण्याची गरज आहे.
हेही वाचा >>>पुणे: संगम घाट परिसरात श्वानांची पाच पिले मृतावस्थेत; पिलांना विष देऊन मारल्याची शक्यता
राज्यपालांविषयी भाष्य करणे टाळले
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी नेमके काय वक्तव्य केले हे मी ऐकलेले नाही. हे पद संवैधानिक असल्याने याबाबत काहीही भाष्य करता येणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पटेल यांनी या वादावर भाष्य करणे टाळले.