पिंपरी : आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्वमान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह ‘इनोव्हेशन व स्टार्टअप’ सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना दिली जाईल. सर्वगुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार आहे, असे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमेरिकास्थित शास्त्रज्ञ डॉ. टोनी नाडर, आयुष मंत्रालयाचे सल्लागार सचिव वैद्य मनोज नेसरी यावेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, ‘योग व आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. शंभराहून अधिक देशांत आयुर्वेद पोहोचला आहे, तर १८० देशांत योगदिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयुर्वेदीय औषधांना, उपचारांना प्रभावी करण्यासाठी व मान्यता मिळण्यासाठी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळेच संशोधनावर भर दिला जात आहे. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयांसारख्या संस्थांमध्ये संशोधन व विकास केंद्राची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. अनेक औषधांना ‘आयएसओ’ मानांकन दिले जात आहे. देशातही घराघरांत आयुर्वेद जाण्यासाठी ‘देश का प्रकृती परीक्षण’ उपक्रम आणला असून, त्यामध्ये सव्वा कोटी लोकांची माहिती संकलित केली आहे’.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन पुण्यात होत असल्याचा आनंद आहे. जगभरातील आयुर्वेदतज्ज्ञ, विद्यार्थी येथे आल्याने विचारांचे आदानप्रदान होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आयुर्वेदाचा समावेश ही चांगली बाब आहे. वैदिक संस्कृती, आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचे पाऊल स्वागतार्ह आहे’.