पुणे : गेल्या काही दिवसांत किमान तापमानात घट झाल्याने पुणे आणि परिसरात गारवा वाढला आहे. गुलाबी थंडीमुळे वातावरण आल्हाददायक झाले असले, तरी हवेमध्ये प्रदूषणकारी धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका पुणे दौऱ्यावर आलेल्या चक्क केंद्रीय मंत्र्यांना बसला आहे. हे मंत्री पुण्यात आल्यानंतर आजारी पडले असून त्याला प्रशासनाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे हे बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी त्यांनी शहरातील धनकवडी परिसरात भारत संकल्प यात्रा अंतर्गत कार्यक्रमात भाग घेतला होता. तसेच गुरुवारी भारत संकल्प यात्रा अंतर्गत वडगाव शेरी भागातील कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान येथे महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत आयोजित खाद्यमहोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते.

हेही वाचा : प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिनी फटाक्यांची आतषबाजी, महापालिकेकडून फटका स्टॉल्सला परवानगी

या कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टरांकडून उपचारही करण्यात आले. उपचारांनंतर ते बहुधा तातडीने दिल्लीकडे प्रयाण करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.