पुणे : प्रधानमंत्री जन धन योजना, अटल पेन्शन योजना यांसह महत्त्वाच्या केंद्रीय योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरील शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करावे. याकरिता सामाजिक कार्येकर्ते, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा, अशा सूचना केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी प्रशासनाला केल्या.जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा मल्होत्रा यांनी सोमवारी घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात वित्त विभागाने विशेष लक्ष घातले आहे. याशिवाय पुण्यात राबविण्यात येणाऱ्या आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण मोहिमेचाही या वेळी आढावा घेण्यात आला.

विभागीय आयुक्तलयात झालेल्या आढावा बैठकीला संचालक जितेंद्र आसती, केंद्रीय सहसचिव रेखा यादव, मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त शंकर एल. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वासेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.मल्होत्रा म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.

हेही वाचा : भूमिगत मेट्रो मार्गिकेतील काम पूर्ण होणारे शिवाजीनगर हे पहिले स्थानक

आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण मोहीम ग्रामपंचायत पातळीवर राबविली जाणार असून या माध्यमातून विविध योजनांचा लाभ ग्रामीण क्षेत्रात सर्वदूर पोहोचावा हाच हेतू आहे. योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावपातळीवर उपक्रमांचे सूक्ष्म नियोजन केले असून अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनीही प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली.

Story img Loader