पुणे – देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रायलयाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यातील कृती आराखड्यानुसार शाळांमध्ये वेलनेस टीमची स्थापना, पालक आणि कुटुंबीयांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या संकेतांना तातडीने प्रतिसाद देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
राजस्थानातील कोटा शहरात यंदा २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा चर्चिला गेला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उम्मीद (अंडरस्टँड, मोटिव्हेट, मॅनेज, एम्पथाइज, एम्पॉवर, डेव्हलप) या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. प्रत्येक मूल महत्त्वाचे आहे, या विचारातून तयार केलेल्या या मार्गदर्शक सूचनांद्वारे संवेदनशीलता, समजूतदारपणा वाढवण्यासह विद्यार्थ्यांनी स्वतःला काही इजा करून घेतल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ मदत करण्याबाबत निर्देश देण्याचा उद्देश यामागे आहे.
हेही वाचा>>>>“संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला”; अविनाश पाटील यांचे वक्तव्य
मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली स्कूल वेलनेस टीमची स्थापना करावी. त्यात समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. अडचणीची परिस्थिती हाताळण्यासाठीचे प्रशिक्षण प्रत्येक सदस्याला देण्यात यावे. विद्यार्थ्याच्या वागणुकीतून काही संकेत मिळाल्यास तातडीने स्कूल वेलनेस टीमला त्याबाबतची माहिती देण्यात यावी. त्यानंतर स्कूल वेलनेस टीमकडून पुढील कार्यवाही केली जाईल. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत जागृती होण्यासाठी दर वर्षी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि शिक्षकांना शाळेकडून मार्गदर्शन करावे. शाळेत सकारात्मक वातावरण ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा>>>>ललित पाटीलला पुणे पोलीस ताब्यात घेणार; पथक मुंबईला रवाना
विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त का होतात?
विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनात अनेक बदलांना सामोरे जातात. त्या दरम्यान त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. उदाहरणार्थ शाळा बदलणे, शाळेतून महाविद्यालयात जाणे, पालक गमावणे, भावंडे, मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावणे. त्याशिवाय त्यांची वाढ होत असताना शारीरिक बदल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बदल, करिअरचे निर्णय, शैक्षणिक ताण त्यांच्यावर येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची कारणे काहीही असू शकतात आणि विद्यार्थ्यागणिक ती बदलतात. त्यामुळे स्वतःच्या पातळीवर ताण हाताळून काहीही मदत मिळत नसल्याचे जाणवल्यावर, असहायतेची भावना निर्माण झाल्यावर विद्यार्थी आत्महत्येकडे वळतात. आत्महत्येचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावना, वागणूक, कृतीतून संकेत मिळतात. हे संकेत ओळखणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.