पुणे : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये शहरी विभागात पुणे महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार महापालिकेला देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. राजेद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगपालिकेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुणे शहराच्या सर्व भागांमध्ये समान दाबाने आणि २४ तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. २०४७ पर्यंतचा विचार करून, शहराची लोकसंख्या ५० लाख गृहीत धरून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर शहरातील पाणी वितरणातील ४० टक्के गळती कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>>शहरातील अभ्यासिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय, नक्की कारण काय ? महापालिका आयुक्तांचा अग्निशमन दलाला आदेश

सध्या पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील ७६ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दररोज चार तास हा पाणीपुरवठा होतो. प्रति व्यक्ती १५७ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी आणि शहरातील सर्व भागांतील नागरिकांना समान पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा यासाठी आतापर्यंत शहरातील ४३ टक्के नळजोडांवर मीटर बसविण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना १०० टक्के दर्जेदार पाणी पुरविले जाते. तसेच नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या ८५ टक्के तक्रारींचे निवारण केले जाते.

पुणे महापालिकेचे पाणीपट्टीच्या वसुलीचे प्रमाण ६० टक्के असून, महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे (एनआरडब्ल्यू) प्रमाण ३० टक्के आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठ्याबाबत पालिका प्रशासन करत असलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार पुणे महापालिकेला मिळाला असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुण्यातील भारत-न्यूझीलंड कसोटी सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांची पाण्यासाठी वणवण…

६० टक्के पाण्याचा पुनर्वापर

शहरातील ९८ टक्के भागांत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आहे. शहरात दररोज तयार होणाऱ्या ४७७ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे प्रमाण सुमारे ७५ टक्के इतके आहे. यापैकी ६० टक्के पाण्याचा पुनर्वापर महापालिकेच्या वतीने केला जातो. कृषी, सिंचन, बांधकाम, उद्याने अशा विविध माध्यमांतून हा वापर केला जात असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात १०० टक्के रहिवासी भागात शौचालये असून, शौचालयांची एकूण संख्या सहा लाख १९ हजार ८२२ आहे. यात ८२२ कम्युनिटी, तर २९२ पब्लिक टॉयलेट्सचा समावेश आहे.