‘शंकरा’ रागावर आधारित शिवशक्ती ही प्रथमच सादर झालेली रचना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘जयोस्तुते’ या गीताचे घोषपथकाने केलेले वादन.. उघडय़ा जीपमधून सरसंघचालकांनी केलेली स्वयंसेवकांची पाहणी.. ध्वजारोहणानंतर सर्वानी एकसुरात ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ गायिलेली प्रार्थना.. ‘हिंदूुत्वाच्या हुंकाराने मनामनातुनी घुमती पडघम, नव्या युगाची दे ललकारी शिवशक्तीचा अपूर्व संगम’ या समूहगीताचे झालेले  गायन.. लक्ष गणवेशधारी स्वयंसेवकांनी रविवारी संघशक्ती आणि नियोजनबद्ध कार्यशक्तीचे दर्शन घडविले.
मारुंजी, जांभे आणि नेरे गावच्या सीमेवरील साडेतीनशे एकर परिसरात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सर्वात मोठय़ा व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित शिवशक्ती कार्यक्रम झाला. २९०० फूट बाय २५०० फूट पटांगणावर जणू आठमजली इमारत असावी २८० फूट लांबीचे, ८० फूट रुंदीचे आणि २५० फूट उंचीचे व्यासपीठ उभारण्यात आले होते. तोरणा किल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर रायगडावरील मेघडंबरीच्या धर्तीवर चौपट उंचीची मेघडंबरी, वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या पाश्र्वभूमीवर विविध संतांच्या प्रतिमांनी सजविलेली १४ प्रवेशद्वारे असे वैशिष्टय़ असलेल्या या भव्य मंडपासाठी २७५ कर्मचारी गेल्या दीड महिन्यांपासून काम करीत होते. दूरवरच्या स्वयंसेवकांसह नागरिकांनाही व्यासपीठावरील सर्व गोष्टी सहजतेने दिसाव्यात हा त्यामागचा उद्देश असल्याचे नितीन देसाई यांनी सांगितले. यापूर्वी कमळाच्या पाकळ्यांतून नरेंद्र मोदी यांचे घडणारे दर्शन आणि वानखेडे स्टेडियमवरील राज्य सरकारचा शपथविधी या सेटचे कलादिग्दर्शन केले होते. मात्र, हे भव्य व्यासपीठ साकारणे एक प्रकारचे आव्हान होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवशक्ती कार्यक्रमाची क्षणचित्रे
– दीड लाखांहून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी.
– १५ वर्षांपासून ते शंभरी पार केलेल्या चार पिढय़ांच्या लाखाहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग.
– तळेगाव दाभाडे येथील १०२ वर्षांचे श्रीधर बल्लाळ आणि ९५ वर्षांचे चंदूलाल मेहता गणवेशामध्ये.
– धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
– गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दिलीप कांबळे हे मंत्री गणवेशामध्ये.
– महामार्गापासून ते मुख्य मंडपापर्यंत वाहतूक नियंत्रणाचे काम स्वयंसेवकांनीच केल्याने पोलीस आणि प्रशासनावरचा ताण झाला हलका.
– संघकार्याची माहिती देणारी सीडी, तिळगूळ वडी, पाण्याची बाटली आणि सरबताचे पॅकेट देऊन येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत.
– महिला पदाधिकाऱ्यांनी एकाच रंगाच्या परिधान केलेल्या साडय़ा.

Story img Loader