लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राखी पौर्णिमेच्या दिवशी दागिने हिसकावणाऱ्या पाच चोरट्यांना पर्वती पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून, सात लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांविरुद्ध जळगाव, अकोला, पुणे, अमरावती शहरात दागिने हिसकावण्याचे ३० गुन्हे दाखल आहेत. राखी पौर्णिमेला दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडून पोलिसांनी अनोखी भेट दिली.
आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५, रा. दत्तनगर, कात्रज), लोकेश मुकुंदा महाजन (वय २४), प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (वय २५), संदीप अरविंद पाटील (वय २८), दिपक रमेश शिरसाठ (वय २५ , सर्व रा. जळगाव) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
आणखी वाचा-पिंपरीत होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ चौघांची ती ट्रिप ठरली अखेरची!
रिक्षा प्रवासी महिलेचे दागिने पर्वती भागातून हिसकावून नेल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली होती. याचदिवशी सदाशिव पेठेत पादचारी महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पर्वती पोलिसांकडून करण्यात येत होता. सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांनी तपास पथकांना चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, चंद्रकांत कामठे यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. पोलीस कर्मचारी किशोर वळे यांना चोरट्यांच्या माहिती मिळाली. चोरटे शिवाजीनगर भागातून प्रवासी बसने जळगावला पसार होण्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.
आणखी वाचा-धक्कादायक! पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेची सोसायटीच्या जिन्यात आत्महत्या
चोरट्यांनी भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली. चोरट्यांविरुद्ध जळगाव, अकोला, पुणे, अमरावती शहरात महिलांचे दागिने हिसकावण्याचे ३० गुन्हे दाखल आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे-पाटील आदींनी ही कारवाई केली.