पुणे : स्वारगेट बस स्थानकात महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या बसस्थानकातील सुरक्षिततेचे सर्व उपाय कुचकामी असल्याचे आढळले आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असताना पोलीस गस्तीचा अभाव आहे, तर काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी चक्क आकाशावर आहे.
‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने स्थानकाची पाहणी केली असता, स्थानकावर अनेक सुविधांची कमतरता असून, काही सुविधांची भीषण दुरवस्था झाली असल्याचे आढळले. स्थानक परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंवर धूळ बसल्याचे दिसत असल्याने यातील चित्रीकरण सुस्पष्ट होते का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. ज्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला, तेथील खांबावर लावलेल्या एका कॅमेऱ्याचा रोख आकाशाकडे असल्याचे दिसून आले, तर एका कॅमेऱ्याचा रोख जमिनीकडे आहे. ही अवस्था पाहता, या कॅमेऱ्यांमध्ये नक्की कसे चित्रीकरण होत असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
स्वारगेट हे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले बस स्थानक आहे. दिवसभरात दीड हजारांहून अधिक बसमधून सुमारे एक लाख प्रवाशांची वाहतूक या स्थानकावरून होते. मात्र, येथे बस स्थानकात पाणपोई आहे. मात्र, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. पंखे, टीव्ही, भोंगे हे नादुरुस्त अवस्थेत आहेत. महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था नसल्याने येथील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कॅमेऱ्यांचे काम मार्गी लागण्याची गरज
शहरातील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविण्यासाठी पुणे पोलिसांना ४३७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या सहा ते सात महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या भागांत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मार्गी लागेल. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात अत्याधुनिक कॅमेरे बसविल्यास आवारातील गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.