पुणे : युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. सन २००५पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.
आतापर्यंत १२२ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘माधव गाडगीळ संशोधन आणि सक्रिय लोकसहभागाद्वारे पृथ्वीरक्षणासाठी अनेक दशके झटले आहेत. नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणावरील जनमत आणि अधिकृत धोरणांवर गाडगीळ यांनी केलेल्या कामांचा मोठा प्रभाव आहे. राज्य आणि राष्ट्रीय धोरणांचे परिणाम मूल्यमापन ते समाजातील अगदी शेवटच्या थरातील (पान ५ वर) (पान १ वरून) व्यक्तींना पर्यावरणाशी जोडणे, अशा कामांचा यात समावेश आहे.
पश्चिम घाट क्षेत्राबाबत काम
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेचे अनोखे केंद्र असलेल्या पश्चिम घाट क्षेत्राबाबत केलेल्या अत्यंत कळीच्या कामासाठी गाडगीळ ओळखले जातात,’ असे ‘यूएनईपी’ने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. यंदाच्या इतर पुरस्कारांमध्ये धोरण नेतृत्व विभागात ब्राझीलच्या मंत्री सोनिया ग्वाजाजारा, प्रेरणा आणि कृती विभागात रोमानिया येथील पर्यावरणप्रेमी गॅब्रिएल पॉन आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील अॅमी बोवर्स कॉर्डलिस, विज्ञान आणि नवसंकल्पना विभागात चीनमधील शास्त्रज्ञ लू क्वी, उद्याोजकीय दृष्टी विभागात इजिप्तमधील सेकेम यांचा समावेश आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
शास्त्रज्ञ म्हणून मनापासून, वस्तुनिष्ठ पद्धतीने, तर्कशुद्ध मांडणी करत गेलो. मला लोकांमध्ये राहून काम करण्याची आवड आहे. त्यामुळे भारतभरात आदिवासी ठिकाणांपासून अनेक ठिकाणी राहिलो, फिरलो. धोरणात्मक काम करता आले. २०१३मध्ये पश्चिम घाटासंदर्भातील अहवाल लिहिला. आजवरच्या कामाचे चीज होत गेले. पुरस्कार मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे.
डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ