सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षांच्या नियोजनातील गोंधळ हे अद्यापही कायम आहेत. या परीक्षांमध्ये महाविद्यालयांना पासवर्ड्स उशिरा मिळणे, काही वेळा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेण्यासाठी अडचणी येणे, वेळापत्रकात आयत्यावेळी होणारे बदल, निकालाबाबतही तक्रारी, असे प्रश्न सोडवताना प्राचार्य जेरीस आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कामकाज या परीक्षांच्या वेळी गाजले नसले, तरी महाविद्यालयांचे प्राचार्य मात्र नियोजनातील गोंधळामुळे जेरीस आले आहेत. गेल्यावर्षीपासून परीक्षा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठवल्या जातात. मात्र, प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असलेले पासवर्ड्स वेळेत मिळत नसल्याची तक्रार प्राचार्याकडून सातत्याने करण्यात आली. परीक्षेच्या आधी १० मिनिटे महाविद्यालयाच्या हातात पासवर्ड्स मिळाल्यामुळे पुढील परीक्षांचे नियोजन करण्यात अडचणी आल्या. अनेकवेळा पासवर्ड्स आले तरीही प्रश्नपत्रिका डाऊनलोड होण्यात अडचणी आल्या. अभियांत्रिकीच्या ऑनलाईन परीक्षांच्या वेळापत्रकातही आयत्यावेळी बदल करण्यात आला.
‘अनेकदा परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हातात पासवर्ड्स आले नाहीत, म्हणून परीक्षा विभागाला विचारल्यावर ‘आमच्याकडेच पासवर्ड्स अजून आले नाहीत’ असे उत्तर परीक्षा विभागाकडून मिळत असे. परीक्षेच्या वेळेपेक्षा दहा किंवा वीस मिनिटे उशिरा परीक्षा सुरू होणे हे बहुतेक महाविद्यालयांना आता सवयीचे झाले आहे. परीक्षा विभागाच्या लॉगनुसार पासवर्ड परीक्षेच्या वेळेपूर्वी पाठवल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर करून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे, त्याच्या प्रती काढणे आणि प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना देणे, हे सगळे नियोजन हे महाविद्यालयांना सांभाळावे लागते. त्याचा विचार होत नाही,’ असे प्राचार्यानी सांगितले.
प्रश्नपत्रिका तयार करण्यात किंवा तपासण्यात, गुण पाठवण्यास उशीर झाला किंवा महाविद्यालयांच्या पातळीवरून अशी कोणतीही चूक झाली तर महाविद्यालयांना पाच हजारांचा दंड विद्यापीठाकडून करण्यात येतो. मात्र, विद्यापीठाच्या बाजूने सुरू असणाऱ्या या गोंधळात विद्यापीठाला दंड कुणी करायचा असा प्रश्न प्राचार्याकडून विचारला जात आहे. परीक्षांच्या नियोजनाबाबत विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियोजनात गोंधळ झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही प्राचार्य करत आहेत.

Story img Loader