पुणे विद्यापीठाच्या परीक्षा गुरुवारपासून (२८ मार्च) सुरू होत असून प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे परीक्षेत कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी संपूर्णपणे काळजी घेण्यात आलेली असून सर्व महाविद्यालयांमध्ये परीक्षेची तयारी झाली असल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी सांगितले.
राज्यभरातील प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठांच्या परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन आणि शासनाच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठाने पर्यायी यंत्रणा उभी करून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राध्यापक संघटनेकडून विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणला जात आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशीही परीक्षा व्यवस्थित होणार नसल्याची भीती काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना घातली जात आहे. मात्र, परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील असा विश्वास डॉ. गाडे यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत डॉ. गाडे म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत होतील. सर्व महाविद्यालयांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळासह सर्व तयारी झाली असल्याचे प्राचार्यानी सांगितले आहे. महाविद्यालयांमध्ये कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत यासाठी विद्यापीठानेही सर्व तयारी केली आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये या परीक्षा होत असल्यामुळे त्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर किंवा चर्चावर विश्वास ठेवू नये. परीक्षा सुरळीत पार पडतील असा विश्वास आहे.’’ याबाबत पुटाच्या अध्यक्ष डॉ. हेमलता मोरे यांनी सांगितले, ‘‘विद्यापीठ परीक्षा घेत आहे. मात्र, कोणत्याही महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षेच्या कामामध्ये सहभागी होणार नाहीत.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्राध्यापकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी’
प्राध्यापकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कार मागे घ्यावा, अशी मागणी विविध घटकांकडून करण्यात येत आहे. ‘आपल्याला मिळणारे वेतन हे सर्वसामान्यांच्या करातून मिळते. हे लक्षात ठेवून प्राध्यापकांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने परीक्षेच्या कामावरील बहिष्कार उठवावा म्हणजे त्यांच्या न्याय्य मागण्यांना समाजही पाठिंबा देईल,’ असे पत्रक अॅड. मु. पं. बेंद्रे, मंगेश तेंडुलकर, अनिल अवचट, डॉ. अरूण निगवेकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, विवेक वेलणकर यांनी पाठवले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University exams from today exams will be without any disturbance dr gade
Show comments