चिन्मय पाटणकर
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तंत्रज्ञान स्वीकारत यूजीसी इंडिया ही व्हॉट्सॲप वाहिनी सुरू केली आहे. त्यामुळे देशभरातील विद्यापीठे, विद्यार्थी आणि शिक्षक, अन्य घटकांना उच्च शिक्षणातील घडामोडींची माहिती थेट त्यांच्या मोबाइलवर मिळणार आहे. यूजीसीकडून नवे निर्णय, योजना, प्रवेशप्रक्रिया, मान्यता या संदर्भातील माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. मात्र तंत्रज्ञानाच्या नव्या काळात नव्या माध्यमाचा स्वीकार करत यूजीसीने व्हॉट्सॲप वाहिनी सुरू केली.
हेही वाचा >>> यंदाचा हिवाळाही उष्ण; ‘नोआ’चा अंदाज; एल-निनोची तीव्रता वाढली
याद्वारे अभ्यासक्रमातील सुधारणा, मूल्यमापन पद्धती, व्यावसायिक विकासाच्या संधी याबद्दलची माहिती विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांना मिळू शकणार आहे. तर परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेशप्रक्रिया आणि अन्य संबंधित माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकेल. यूजीसीने व्हॉट्सॲप वाहिनी सुरू करणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. या माध्यमाद्वारे उच्च शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि माहितीपूर्ण होण्यास मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून यूजीसीने संवादाची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे सर्व भागधारकांना तत्काळ माहिती मिळेल. तसेच कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि कार्यक्षमता येईल, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी दिली. https://www.whatsapp.com/channel/0029VaCh6c50gcfMkcXzgq1w या दुव्याद्वारे व्हॉट्सॲप वाहिनीला सहभागी होता येईल.