पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यार्थी, पालकांना बोगस विद्यापीठांतील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. काही संस्था यूजीसीच्या कायद्याचे उल्लंघन करून अवैधरीत्या पदव्या देत असल्याचे निदर्शनास आले असून, मान्यता नसलेल्या संस्थांकडून दिलेल्या कोणत्याही पदव्या उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी वैध राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत बोगस विद्यापीठे, बनावट पदव्यांच्या घटना उघडकीस येत असल्याने यूजीसीकडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात येते. तसेच विद्यार्थी, पालकांना फसवणुकीपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही यूजीसीकडून करण्यात येते. या पार्श्वभूमीवर, आता नव्या शैक्षणिक वर्षासाठीची लगबग सुरू झाली असल्याने यूजीसीकडून सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यूजीसीने नोटिशीत नमूद केल्यानुसार यूजीसी कायदा १९५६नुसार केवळ राज्य कायदा, केंद्रीय कायदा किंवा प्रांतिक कायद्यांतर्गत स्थापन झालेली विद्यापीठे आणि संस्था, अथवा विशेष अधिकार प्राप्त संस्थांनाच अधिकृतपणे पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. मात्र, काही संस्था यूजीसी कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात जाऊन पदव्या प्रदान करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अशा सस्थांकडून दिल्या जाणाऱ्या पदव्या मान्यताप्राप्त असणार नाहीत, तसेच त्या उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी वैध राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांची माहिती यूजीसीच्या संकेतस्थळाद्वारे तपासावी. तसेच कोणतेही विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्था यूजीसीच्या नियमाचे उल्लंघन करून अभ्यासक्रम राबवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत ugcampc@gmail.com या ई-मेलद्वारे यूजीसीच्या निदर्शनास आणून देण्याबाबतही नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, देशभरातील बोगस विद्यापीठांची यादी यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार देशभरात एकूण २१ बोगस विद्यापीठे असून, त्यात राज्यातील नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश आहे.