लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सह विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक अडीअडचणींबाबत चर्चेसाठी विद्यार्थी संघटनांतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियोजित कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परवानगी देत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली नसून प्रस्ताव विचाराधीन असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

विविध विद्यार्थी संघटनांतर्फे १० मे रोजी नाना पटोले यांचा विद्यार्थी संवाद कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळण्यासाठी विद्यापीठाच्या कुलसचिवांना 3 मे रोजी पत्र दिले होते. पाच दिवस होऊनही विद्यापीठाकडून काहीच कळवण्यात आले नाही. कार्यक्रमाला केवळ एक दिवस बाकी असूनही अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा… आरटीई प्रवेशांसाठी आता १५ मेपर्यंत मुदतवाढ

त्यामुळे याबाबत विचारणा केल्यावर जी-२० परिषदेसंदर्भातील कार्यक्रम विद्यापीठात होणार असल्याने परवानगी मिळणार नसल्याचे तोंडी सांगण्यात आले. मात्र विद्यापीठाने परवानगी दिली नाही तरी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, असे स्टुडंट हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाच्या परवानगीसंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University is not giving permission for the nana patoles programme in pune print news ccp 14 dvr