पुणे : राज्यातील चार कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांवर विद्यापीठ स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी १० डिसेंबर रोजी जागेवरील प्रवेश फेरी राबवण्यात येणार असून, २०२४-२५साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक हरिहर कौसडीकर यांनी ही माहिती दिली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कृषी परिषदेकडून १८ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आली. भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या जागेवरील ८ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. मात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागा विद्यापीठ स्तरावर भरण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या मुख्यालयी १० डिसेंबर रोजी जागेवरील प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. या फेरीसाठी कृषी परिषद स्तरावर या पूर्वी राबवलेल्या प्रक्रियेअंतर्गत रिक्त जागा, तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोट्यातील रिक्त जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रिक्त जागांचा तपशील https://pg.agrimcaer.in/ या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. २०२४-२५साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
हेही वाचा >>>पुणे: १९ वर्षीय तरुणाने मद्यपान करून वाहनांना दिली धडक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
राज्यातील कृषी विद्यापीठांतील प्रवेशित उमेदवारांना जागेवरील प्रवेश फेरीसाठी सहभागी होण्यासाठी त्यांना त्यांनी घेतलेला प्रवेश रद्द केल्यास जागेवरील प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती लागू होणार नाही ही बाब लक्षात घेणे आवश्यक असल्याचे कौसडीकर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.