‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान.’ या काव्यपंक्ती तीन तपे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. या विद्यापीठ गीताचे जनक होते मंगेश पाडगावकर. पाडगावकरांच्या विद्यापीठाशी जोडलेल्या या चिरकालीन नात्याची ही गोष्ट..
त्या वेळच्या पुणे विद्यापीठाकडून पु. ल. देशपांडे यांना १९८० साली डि.लिटने सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू होते डॉ. राम ताकवले. पदवीदान समारंभात बोलताना पुलंनी दोन सूचना केल्या होत्या. पहिली म्हणजे पदवीदान समारंभातील सर्व विधी हे मराठीत व्हावेत आणि दुसरी म्हणजे पुणे विद्यापीठाला स्वत:चे स्वतंत्र गीत असावे. परदेशातील विद्यापीठांचे आपले स्वतंत्र गीत असते, त्याप्रमाणेच पुणे विद्यापीठाचेही गीत असावे आणि विद्यापीठाच्या समारंभांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच त्याचेही गायन व्हावे, या पुलंनी मांडलेल्या संकल्पनेचे विद्यापीठ आणि पुण्याच्या शिक्षण विश्वातून स्वागत झाले. मग प्रश्न उभा राहिला हे गीत लिहावे कुणी? त्या वेळी पुलंनीच मंगेश पाडगावकर यांचे नाव सुचवले. पाडगावकरांकडून पुढील पदवीदान समारंभापूर्वी गीत लिहून घेतोच अशी हमीही घेतली आणि पुणे विद्यापीठाचे वैशिष्टय़ बनून राहिलेले ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान..’ हे शब्द पाडगावकरांच्या लेखणीतून उतरले.
संगीतकार भास्कर चंदावरकर हे त्या वेळी ललित कला केंद्रात अध्यापन करत होते. त्यांनी या विद्यापीठ गीताला स्वरबद्ध केले आणि २६ मार्च १९८१ रोजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात या गीताचे पहिल्यांदाच गायन झाले. तेव्हापासून विद्यापीठाचा प्रत्येक पदवीप्रदान समारंभ, वर्धापन दिन अशा कार्यक्रमांत राष्ट्रगीतानंतर विद्यापीठ गीताचे गायन होते. पाडगावकरांच्या हस्ताक्षरातील आणि त्यांची पल्लेदार स्वाक्षरी असलेली विद्यापीठ गीताची प्रत विद्यापीठाच्या प्रत्येक विभागामध्ये लावलेली आहे. पाडगावकरांना २०१२ मध्ये विद्यापीठाकडून ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.