पिंपरी- चिंचवड शहरामधील पिंपळे सौदागर आणि राहटणी परिसरात अज्ञात टोळक्याने २० ते २२ वाहनांची तोडफोड केली आहे. कोयते आणि सिमेंट च्या गट्टूनी वाहनांची तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. टोळक्याला अडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अज्ञातांनी धक्काबुकी केली असून ते रिक्षातून फरार झाले आहेत.
हेही वाचा- पुणे : IPS कृष्ण प्रकाश आणि अंकुश शिंदेंमुळे २०२२ हे वर्ष पिंपरी- चिंचवडकरांच्या लक्षात राहील!
नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्याची हद्द असलेल्या राहटणी आणि पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण २० ते २२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शनिवारी ३१ डिसेंबर असल्याने शहरात दीड हजारापेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता. तरी देखील अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन दिसेल त्या दुचाकी, चारचाकी ला लक्ष करत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलीस कर्मचाऱ्याने केला पण त्यांना धक्काबुकी करून अज्ञात तोडफोड करणारे व्यक्ती पसार झाले आहेत. याबाबत सांगवी आणि वाकड पोलिस अधिक तपास करत असून शहरातील गुन्हेगारी रोखण्याबाबत पोलीस आयुक्त विणयकुमार चौबे यांच्या पुढं मोठं आव्हान असेल हे मात्र नक्की.