लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कोंढवा परिसरात बेकायदा जनावरांची कत्तल रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढव्यातील मीठानगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक चंद्रकांत मिसाळ यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कोंढवा परिसरातील एका पत्राच्या शेडमध्ये पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे एक पथक कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. कारवाईला विरोध करण्यासाठी दहा ते पंधरा जण तेथे जमले. त्यानंतर जमाव पोलिसांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करुन पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी तेथून २० ते २५ किलो मांस आणि साहित्य जप्त केले.