पिंपरी पालिकेचा कारभार नियोजनशून्य असून प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिला नाही. शहराच्या प्रश्नांना कोणीही वाली राहिला नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या कारभाऱ्यांवर केली आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तिकराचा प्रश्न सुटलेला नाही. संरक्षण खात्याचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. सर्व जुनीच कामे सुरू असून नवीन काही होताना दिसत नाही, अशा शब्दांत पवारांनी भाजपवर आगपाखड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निगडी प्राधिकरणात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार यांनी पिंपरी पालिकेच्या कारभारावर ‘हल्लाबोल’ केला. ते म्हणाले, पिंपरीत १५ वर्षे सत्तेच्या माध्यमातून भरीव विकासकामे केली. ‘स्वच्छ शहर’ म्हणून शहराचा लौकिक होता. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी शहराचे कौतुक केले, ‘बेस्ट सिटी’ म्हणून केंद्र सरकारचा पुरस्कारही मिळाला. मात्र, आजची अवस्था काय आहे, पालिका चालवतंय कोण? नुसतेच घोटाळे सुरू आहेत. विकासकामे थंडावली आहेत. पिण्याचे पाणी विस्कळीत आहे. भविष्यकालीन तरतूद म्हणून मंजूर करून ठेवलेले अतिरिक्त पाणी सत्ताधाऱ्यांनी रद्द केले. शहरात नवीन कामे सुरू झालेली नाहीत. निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय होत नाही. शास्तिकर रद्द झालाच नाही. अनधिकृत बांधकामांचा निर्णय झाला नाही. संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न तसेच आहेत. बोपखेलचा उड्डाणपूल झाला नाही. पिंपळे सौदागरचा रस्ता अद्याप सुरू झालेला नाही. गरिबांना घरे देताना यांनीच खोडा घातला. कामे काहीच नाही, मात्र निव्वळ जाहिरातबाजी सुरू आहे. वाढदिवसाचे फलक शहरभर झळकत आहेत. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य शासनाकडे तसेच केंद्र सरकारकडे असलेले प्रश्न अनुत्तरित आहेत. नेहरू अभियानांतर्गत शहराला भरीव निधी मिळाला होता. आता तसे होत नाही. स्मार्ट सिटीची प्रगती काय, त्यामुळे शहराचा नेमका काय फायदा झाला, याचे उत्तर कोणाकडेही नाही.

सत्ता गेल्याचे दु:ख नऊ महिन्यांनंतरही..

शहरभरात विकासाची कामे करूनही पिंपरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारण्यात आल्याचे अजित पवारांचे दु:ख नऊ महिन्यांनंतरही कायम आहे. पक्षकार्यकर्त्यांसमोर त्यांनी हे दु:ख बोलून दाखवले. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. भाजपचा सर्व फौजफाटा तेथे जाऊनही जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला, मात्र राज्यात सर्वाधिक विकास पिंपरी-चिंचवडमध्ये झाला असतानाही पिंपरीत तसे का घडले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unplanned management in pimpri municipal corporation
Show comments