‘चिमणराव- गुंडय़ाभाऊ’मुळे घराघरात पोहोचलेले आणि कोमल विनोदाचे जनक म्हणून मराठी रसिकांना प्रिय असणारे चिंतामण विनायक ऊर्फ चिं.वि. जोशी पुन्हा एकदा नव्याने साहित्यप्रेमींना भेटणार आहेत. चिंविंचे अप्रकाशित साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर असून यांतील दोन पुस्तके लवकरच रसिकांच्या हाती पडतील. चिं.वि.यांची नात अलका जोशी- मांडके यांनी याविषयी माहिती दिली.
चिंविंनी लिहिलेल्या तीन सामाजिक एकांकिकांची ‘त्रिसुपर्ण’ ही नाटय़पुस्तिका, तसेच त्यांचे ‘वडाची साल पिंपळाला’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. काँटिनेंटल प्रकाशनातर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात येणार असल्याचे अलका जोशी- मांडके यांनी सांगितले. याशिवाय चिंविंचे काही अप्रकाशित हस्तलिखित कागदही जोशी कुटुंबाच्या संग्रही असून आगामी काळात या हस्तलिखितांचेही प्रकाशन करण्याचा त्यांचा विचार आहे.
अलका जोशी- मांडके म्हणाल्या, ‘‘या दोन पुस्तकांव्यतिरिक्त चिंविंच्या इतर दोन कादंबऱ्या प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. चिं.वि. यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी यांनी लिहिलेली ‘प्रवरा’ ही कादंबरी अपूर्ण राहिली होती. ही कादंबरी चिंविंनी लिहून पूर्ण केली होती. तसेच चिंविंची ‘बालयोगी’ ही कादंबरीही अपूर्ण राहिल्यामुळे ती म. वि. जोशी यांनी लिहून पूर्ण केली होती. या दोनही कादंबऱ्या सुमारे ५०- ६० वर्षांपूर्वी प्रकाशित झाल्या होत्या. त्यांच्या नवीन आवृत्या प्रकाशित करण्याची आमची इच्छा आहे; परंतु त्यांच्या मूळ प्रती जोशी कुटुंबाकडेही नाहीत. या कादंबऱ्या पॅरॅमाऊंट प्रकाशनाने प्रकाशित केल्या असल्याची माहिती असून या प्रकाशन संस्थेकडेही त्यांच्या प्रती मिळू शकल्या नाहीत. या प्रती सध्या केवळ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे उपलब्ध असून त्यांनी त्या प्रकाशनासाठी उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्या नव्या आवृत्या काढता येतील.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा