पुणे : ऐन होळी-धुळवड सणाच्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतील रब्बी हंगामात काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपई फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिकसह खान्देश, मराठवाडय़ात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस झाला. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, कांदा, मक्याची काढणी सुरू झाली आहे. अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्यामुळे वाळलेली पिके भिजली आहेत. वादळी वाऱ्यांमुळे शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. गहू भिजल्यामुळे दर्जा खालावणार आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भेंडीसह अन्य भाजीपाल्याचे नुकसान झाले. भेंडीची फुले गळणे, करपा, बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
फळे झाली मातीमोल
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, पपईचे पीक वादळी वारा, गारपीट आणि पावसामुळे मातीमोल झाले आहे. खान्देशसह सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. निर्यातीसाठी चांगला दर मिळत असतानाच केळीचे पीक हातचे गेले आहे. नाशिकमधील सिन्नर, निफाड तसेच नगर येथील द्राक्षांची काढणी सुरू आहे. अशा अवस्थेत मुसळधार पाऊस झाल्यामुळे द्राक्षाचे मणी फुटून गळून पडू लागले आहे. वातावरणात बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यामुळे द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. मणी फुटल्यामुळे एका रात्रीतच काळी बुरशी वाढली आहे. द्राक्षांतील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे दर्जा आणि उत्पादनांवरही परिणाम होणार आहे. परिसरातील पपईच्या बागाही वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडल्या आहेत. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, मानोरा, रिसोड परिसरांत संत्रा बागांचे नुकसान झाले आहे.मोसमी पाऊस परत फिरल्यानंतर पडणाऱ्या प्रत्येक पावसाला अवकाळी पाऊस म्हटले जाते. होळी-धुळवडीच्या दिवशी पडलेला पाऊस यंदाच्या हंगामातील पहिलाच अवकाळी पाऊस आहे.
धुळय़ाला गारपिटीचा तडाखा
धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने भागात आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागांत सुमारे तासभर गारपीट झाली. रस्ते, शेतशिवारांत गारांचा सडा पडला होता. सर्वत्र पाढऱ्या रंगाची चादर पसरल्याचे चित्र होते. गारपीट झालेल्या परिसरात रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके वाया गेली आहेत.
तातडीने पंचनाम्याचे आदेश
राज्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. या दृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आजही हलक्या सरी, गारांचा अंदाज
पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, बुधवारीही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. ८ मार्चपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली आहे. बुधवारी कोकण आणि गोव्यात कोरडय़ा हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची, तर काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.