थंडीऐवजी राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी; रब्बी हंगामावर परिणाम
पुणे : दिवाळीनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असताना राज्यातील अनेक भागात सोमवारी पावसाने अचानक हजेरी लावली. रत्नागिरी, परभणी, लातूर, सांगली, पंढरपूर आणि कोल्हापूर येथे मुसळधार पाऊस पडला. तर, राज्यभरात सर्वत्र ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण होते. कोकण, गोवा, उत्तर-मध्य आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मंगळवारी (२० नोव्हेंबर) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी या पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागते. मात्र, यंदा दिवाळीपूर्वी तीन दिवस पाऊस झाला. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात थंडी सुरू झाली होती. मात्र मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये रविवारपासून उकाडा जाणवत होता. सोमवारी मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये दिवसभर विचित्र ढगाळ वातावरण होते.
मराठवाडय़ात मुसळधार
परभणी आणि लातूर जिल्ह्य़ात रविवारी आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली. पालम तालुक्यातील बनवस गावात वीज कोसळली. बालाघाट डोंगर परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हा पाऊस
आणखी जोरदार झाला असता, तर काही ठिकाणी झालेल्या रब्बीच्या पेरणीला दिलासा मिळाला असता. राणीसावरगाव (ता. गंगाखेड), चाटोरी (ता. पालम) येथेही पावसाची नोंद झाली. खोरस, आडगाव, खडी, बनवस या गावांमध्ये पाऊस झाला. मात्र नांदेड महामार्गापासून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होते. कंधार, लोहा (जि. नांदेड) तालुक्यात चांगला पाऊस झाला. तो रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार असला, तरी ढगाळ वातावरण अळीसाठी निमंत्रण देणारे ठरणार आहे. निलंगा, औसा आणि रेणापूर तालुक्यासह अनेक ठिकाणी रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. लातूर शहरात फक्त एक मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाचा लाभ खरीप हंगामातील तुरीला तसेच रब्बी हंगामाच्या पेरणीला लाभदायक ठरणार आहे.
शेतकऱ्यांना फटका
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून सांगलीतील द्राक्ष उत्पादकही या अवकाळी पावसाने चिंतेत सापडला आहे. सुगीच्या काळात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार तर, सायंकाळीही हलका पाऊस झाला. सांगली, सोलापूरमध्येही पावसाने हजेरी लावली. यामुळे साखर कारखान्यांच्या ऊसतोडीही थांबल्या आहेत.
* थंडी गायब होऊन अवकाळी पाऊस
* कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हजेरी
* कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ
* पाऊस नसलेल्या भागात दिवसा ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण
* मंगळवारीही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता