पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरास गुरुवारी (३ एप्रिल) सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. सव्वातास झालेल्या पावसाने पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. या पावसाने दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे पिंपळे गुरव व वाकड येथे झाडपडीच्या घटना घडल्या.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण तयार होत होते. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. गुरुवारीही सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दिवसभर या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी साडेतीननंतर अचानक ढग दाटून आले. साडेचार वाजता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. काही वेळ पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र, त्यानंतर मुसळधार पावसास सुरुवात झाली. सव्वातास पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने कामावरून सुटलेल्या कामगारांची, महिला वर्गाची तसेच, वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडवली.