पुणे : राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. अवकाळीमुळे द्राक्ष मण्यांना तडे गेल्यामुळे घडात बुरशी वाढू लागली, द्राक्ष ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत खाण्यायोग्य राहत नसल्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना बेदाणा तयार करावा लागत आहे.
सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग, सोलापूर, इंदापूर, उस्मानाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती होते. यंदा पूर्व हंगामी द्राक्ष पिकाला अवकाळी पावसाचा, गारपिटीचा फटका बसला, त्यामुळे द्राक्ष मण्यांत गोडी भरताना मण्याला तडे जात आहेत. घडात बुरशी वाढत आहे. द्राक्षे ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत घडातून मणी सुटून काळे पडणे, बुरशी वाढणे, असे प्रकार घडू लागल्यामुळे व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बागा सोडून दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर बेदाणा निर्मिती शिवाय कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीपासूनच बेदाणा निर्मिती सुरू झाली आहे. पण, द्राक्षात पुरेशी गोडी नसल्यामुळे हलक्या दर्जाचा बेदाणा तयार होत आहे.
फेब्रुवारीमध्ये विशेषकरून बेदाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या द्राक्षांपासून बेदाणा निर्मिती सुरू झाली आहे. तापमान वाढीमुळे गोडी चांगली भरल्यामुळे चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार होत आहे. यंदा मार्चअखेरपर्यंत हंगाम चालण्याचा अंदाज असून, सुमारे दोन लाख टन बेदाणा निर्मिती होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शिल्लक बेदाण्यामुळे दर जेमतेम
मागील हंगामात सुमारे पन्नास हजार टन जास्त बेदाणा तयार झाला होता. त्यातील सुमारे ४० टक्के बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे. त्यामुळे नव्या बेदाण्याच्या दरावर परिणाम होत आहे. सध्या सांगली आणि तासगावच्या बेदाणा बाजारात हिरव्या रंगाच्या दर्जेदार बेदाण्याला १२० ते १४० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. विक्रीला जुना आणि नवा बेदाणा येत आहे. उत्तर भारतात थंडी कमी होत आहे. त्यामुळे द्राक्षाच्या मागणीत वाढ झाली आहे, दरातही २० ते ४० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरातही लवकरच वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कवठेमहांकाळ येथील द्राक्ष उत्पादक दिनकर गुजले यांनी दिली.
मार्चअखेर हंगाम सुरू राहणार
जानेवारीपासून बेदाणा निर्मिती सुरू झाली आहे. सध्या दर्जेदार बेदाणा उत्पादित होत आहे. मार्चअखेर हंगाम सुरू राहून सरासरीइतका बेदाणा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सध्या दर्जेदार हिरव्या बेदाण्याला शेतकऱ्यांना सरासरी १२० ते १४० रुपये किलो दर मिळत आहे, अशी माहिती तासगाव येथील बेदाणा उत्पादक प्रशांत जाधव यांनी दिली.