लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. शनिवार, रविवारी पावसाचा जोर जास्त राहील. हवामान विभागाने यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीसाठी आणि पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला रविवारी पावसासाठी नारंगी इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसासाठी नारंगी इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणला पिवळा इशारा देण्यात आला आहे. रविवारी, १२ मे रोजी पुणे, सातारा, लातूर, नांदेडला अवकाळी पावसासाठी आणि यवतमाळ, चंद्रपूरला पाऊस आणि गारपिटीसाठी नारंगी इशारा देण्यात आला आहे. ठाणेवगळता अन्य जिल्ह्यांना पावसासाठी पिवळा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी, १३ मे रोजी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हेवगळता अन्य जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची शक्यताही वर्तविली आहे.

आणखी वाचा-प्रचाराचा शेवटचा दिवस पावसात धुवून निघणार? हवामानाचा अंदाज काय?

पारा चाळिशीच्या आत

ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे शुक्रवारी राज्यातील सहा जिल्हेवगळता अन्यत्र पारा चाळिशीच्या आत राहिला. अकोल्यात सर्वाधिक ४२.५, अमरावती ४०.६, वाशिम ४१.२, वर्धा ४१, यवतमाळ ४०, बीड ४०.३ आणि मालेगावात ४१.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागात कमाल तापमान चाळीश अंशांच्या आत होते.

नारंगी इशारा

शनिवार – पुणे (अवकाळी)
रविवार – पुणे, सातारा, लातूर, नांदेड (अवकाळी)
यवतमाळ, चंद्रपूर (अवकाळी आणि गारपीट)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rains will increase where is the orange alert of meteorological department pune print news dbj 20 mrj