महापालिकेने खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात बसवलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी (१९ एप्रिल) कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एअर मार्शल के. ए. गिल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.
महापौर वैशाली बनकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी- एनडीए) छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासंबंधीचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. प्रबोधिनीतील कॅडेट मेसच्या समोरील कारगील स्मारकाजवळ असलेल्या साठ हजार चौरसफूट मोकळ्या जागेत हा पुतळा बसविण्यास प्रबोधिनीच्या प्रशासनाने मान्यता दिली होती. त्या निर्णयानुसार पुतळा बसविण्याचे काम महापालिकेने केले असून त्याबरोबरच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. विविध ठिकाणी कारंजी बसविण्यात आली आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणात हिरवळही विकसित करण्यात आली आहे.
प्रबोधिनीची मुख्य इमारत व लगतच्या परिसराचा विचार करून पुतळ्याच्या चौथऱ्याची, तसेच तटबंदीप्रमाणे सीमाभिंत आणि बुरुजांची रचना करण्यात आली आहे. हे सर्व काम खास दगडांमध्ये घडवण्यात आले आहे. या जागेतील कारगील स्मारकाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. या भागात जाण्यासाठीचे मार्ग, मार्गाच्या बाजूने विद्युत रोषणाई ही कामेही महापालिकेतर्फे करून देण्यात आली आहेत. या सर्व कामांसाठी महापालिकेने तीन कोटी ८० लाख रुपये इतका खर्च केला आहे. कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सकाळी दहा वाजता केले जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एअर मार्शल के. ए. गिल, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.