पुणे : पावसाने ऑगस्ट महिन्यात दिलेली उघडीप, मोसमी आणि बिगरमोसमी पाऊस न झाल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिक घट येण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र समाधानकारक उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मांडाखळी (ता. जि. परभणी) येथील रमेश राऊत कापूस उत्पादनाविषयी म्हणाले, की मराठवाड्यात सिंचनाची सोय असलेल्या जमिनीत सरासरी ६० आणि कोरडवाहू जमिनीत जेमतेम ३० टक्क्यांपर्यंत कापूस उत्पादन होईल. ऑगस्टमधील पावसाच्या ओढीमुळे कापूस पिकाची चांगली वाढ झाली नाही. माघारी मोसमी पाऊस अथवा बिगरमोसमी पाऊस न झाल्यामुळे कापसाची बोंडे लहान राहिली आहेत. आता पाण्याअभावी पाने गळून पडू लागली आहेत. अनेक ठिकाणी कापसाचे पीक करपून गेले आहे. यंदा लाल बोंडअळीचा प्रादुर्भाव नाही. पण, पाऊस नसल्यामुळे करपा आणि अळीचा प्रादुर्भाव आहे. पाण्याअभावी सिंचनाची सोय असलेल्या जमिनीत उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत, तर कोरडवाहू जमिनीत उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – पिंपरी : चिखलीत पाच एकर जागेत गोशाळा; मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार

साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील शेतकरी देविदास पांचाळ म्हणाले, की विदर्भासह अमरावती भागात यंदा चांगला पाऊस झाला. पावसाने सरासरी भरून काढली; पण कमी दिवसांत, जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीत चांगली ओल तयार झाली नाही. पाणीपातळी वाढली नाही. सिंचनासाठी आता पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. कापसाची वेचणी दिवाळीनंतर सुरू होईल. तोपर्यंत पाणी पुरणार नाही. पाण्याअभावी उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचं लाक्षणिक उपोषण

यंदा राज्यातील कापूस उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के घट येण्याचा अंदाज आहे. पावसाअभावी मराठवाड्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. पण, कमी पाण्यामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. राज्यातील सुत गिरण्यांना कर्नाटकातील विजापूर, चिकमंगळूर, धारवाड आदी भागांतही यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. कापूस आखूड आणि वजनाने जास्त भरत आहे. त्याचा परिणाम उद्योगावर होणार आहे. विदर्भातून चांगला कापूस बाजारात येईल, अशी उद्योगाला अपेक्षा आहे. यंदा कापूस उत्पादनात सरासरीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सांगितले.