कमी वेळेत अचूक मीटर वाचन व वीजवापराबाबत नेमके देयक देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) व इन्फ्रारेड (आयआर) मीटर बसविण्यात येत आहेत. पुणे विभागामध्ये अशा प्रकारचे तीन लाख ७० हजार मीटर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. हे मीटर बसविण्यासाठी ग्राहकाला कोणताही खर्च करावा लागत नसल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रेडिओ फ्रिक्वेंसी मीटर शहरी भागात, तर इन्फ्रारेड मीटर ग्रामीण भागात लावण्यात येणार आहेत. सध्या फोटो मीटर रिडिंगनुसार वीजबिल दिले जाते. त्यात प्रत्यक्ष मीटरचा फोटो घेणे, रिडिंगची नोंद करणे, पंचिंग करणे व त्यानंतर वीजबिल तयार करणे अशी मोठी प्रक्रिया असते. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर असल्याने बिलांमध्ये चुका होतात. नव्या मीटरच्या माध्यमातून बिलाच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. दोन्ही प्रकारच्या मीटरचे मासिक वीजवापराचे रिडिंग हॅण्ड हेल्ड या यंत्रणेद्वारे घेऊन ही माहिती थेट संगणकाला जोडून वीजबिल तयार करण्यात येईल.
शहरी भागामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी मीटर बसविल्यानंतर सुमारे ३० मीटर अंतराच्या परिघातील प्रतिमीटर सात सेकंद वेगाने हॅण्ड हेल्ड यंत्रणेच्या माध्यमातून शेकडो वीजमीटरचे वाचन करता येणार आहे. त्यामुळे रिडिंग नोंदविण्यातील मानवी चुका, मीटरवाचनातील अडथळे दूर होऊ शकणार आहेत. ग्रामीण भागात बसविण्यात येणाऱ्या इन्फ्रारेड वीजमीटरचे हॅण्ड हेल्ड यंत्रणेद्वारे वाचन होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातीलही रिडिंग घेण्याच्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होऊ शकणार आहेत.                                                                                                                                                                                                             (संग्रहित छायाचित्र)

Story img Loader