पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद ते पर्यटन असा बदल झाला आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील ४८ ठिकाणी पर्यटनासाठी जाता येईल. त्या दृष्टीने साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उप्रक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असून, सियाचिन, गलवान, कारगिल युद्धभूमी पर्यटकांना खुली करण्यात येणार आहे. त्यातून युद्धभूमीवरील जवानांचे आयुष्य पर्यटकांना पाहता येईल,’ अशी माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारताच्या विकासामध्ये भारतीय लष्कराची भूमिका आणि योगदान’ या विषयावर द्विवेदी यांचे व्याख्यान झाले.

देशाच्या विविध भागांत आणि विविध क्षेत्रांत लष्कर देत असलेल्या योगदानाबाबतची मांडणी लष्करप्रमुखांनी व्याख्यानात केली. देशाच्या विकासातील कोणताही अडथळा देशविघातक असल्याचे नमूद करून ते म्हणाले, की सीमा संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, मानवी सहकार्य आणि संकट व्यवस्थापन ही लष्कराची भूमिका आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लष्कर प्रथम प्रतिसाद देते. करोना काळातही नवीन रुग्णालये उभारण्यापासून विविध स्तरांवर लष्कराने योगदान दिले. रस्तेबांधणी, पूलउभारणी, शेती, पाणीपुरवठा, वीज, खेळ, शिक्षण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत लष्कर कार्यरत आहे. त्या शिवाय, सीमावर्ती भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

हेही वाचा >>>थंडीमुळे पुण्यात हुडहुडी;  एक आकडी तापमानाची नोंद

स्मार्ट’ सीमा करण्याकडे लक्ष

आता देशाच्या सीमा ‘स्मार्ट’ करण्यावर भर आहे. त्यात सीमावर्ती भागात फोर-जी सेवा सुरू केली जात आहे. देशातील ३५०पेक्षा जास्त लष्करी चौक्यांवर फोर-जी सेवा सुरू झाली आहे. त्याशिवाय, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ६०० गावांमध्ये सांस्कृतिक पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. वारसा स्थळांचे जतन लष्कर करत आहे. संग्रहालयांची उभारणी करण्यात येत आहे. मणिपूर हिंसाचारावेळी कुकी, मैतेयी यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न लष्कराच्या ज्येष्ठांकडून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सीमावर्ती भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. पर्यटकांना सोयीची प्रणाली विकसित होण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवण्यात येत असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुण्यात स्पष्ट केले.

५० हजार कोटींवर निर्यात शक्य’

लष्करी साहित्याची आजवर देशात आयात केली जात होती. मात्र, आता भारत लष्करी साहित्याची निर्यात करणारा देश झाला आहे. अनेक छोट्या गावांमध्येही लष्करी साहित्याला लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या उभ्या राहत आहेत. त्यात महाराष्ट्राचे, पुण्याचे योगदान महत्त्वाचे आहे. २०२९-३०पर्यंत भारत ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त साहित्याची निर्यात करू शकेल, असे द्विवेदी म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upendra dwivedi informed that tourism is possible in siachen kargil battlefields amy