लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : टेल्को रस्त्यावरील, भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा मार्ग अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी मार्गिका, वाहनतळ, सायकल मार्ग, हरितपट्टा, सेवावाहिन्या, पदपथ, व्यायामशाळा, शौचालय उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्ज काढून हे काम करणार असून, या कामासाठी ८१ कोटी ७७ लाख ५५ हजार ५५६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
शहरातील टेल्को रस्ता हा मुख्य रस्त्यांपैकी एक महत्त्वाचा रस्ता आहे. दुर्गा चौकापासून इंद्रायणीनगरपर्यंत हा रस्ता साडेआठ किलोमीटर अंतराचा आहे. त्यांपैकी गवळी माथा ते इंद्रायणीनगर या सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. यांची नियुक्ती केली. रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण आणि नकाशे तयार केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सद्य:स्थितीतील सहा पदरी रस्ता अपुरा पडत असल्याने वाहतूककोंडी होत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. त्यासाठी हा सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ता विकसित करण्याचे नियोजन केले गेले. त्यानुसार, ९० कोटी ६५ लाख ७७ हजार ४५५ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली गेली. यामध्ये केवळ दोन ठेकेदारांनी भाग घेतला. दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतरही दोनच ठेकेदारांनी या कामासाठी निविदा भरली. त्यानंतर महापालिकेने ११ टक्के कमी दराची निविदा स्वीकारली. त्यांच्याकडून ८१ कोटी ७७ लाख ५५ हजार ५५६ रुपयांमध्ये काम करून घेण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या कामाची मुदत ३६ महिन्यांची आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला मार्गिका
महापालिकेच्या नियोजनानुसार, सव्वा किलोमीटर अंतराच्या दोन्ही बाजूंना एकेक मार्गिका करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता आठपदरी होणार आहे. डांबरीकरणाच्या थराने मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस ९०० मिलिमीटर व्यासाची पावसाळी वाहिनी टाकण्यात येणार आहे. नवीन उंच दुभाजक आणि आवश्यक ठिकाणी सेवा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
सायकल मार्गिका, हरितपट्टा
वाहनतळ, मल्टियुटिलिटी झोन, सायकल मार्गिका, हरितपट्टा, सेवावाहिन्या, व्यायामशाळा आणि दोन ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार आहेत. उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, आकर्षक पथदिवे बसविणे, पाच जलवाहिन्या स्थलांतरित करणे, ३०० आणि ४५० मिलिमीटर व्यासाच्या नवीन जलनि:सारण वाहिन्या टाकणे अशीही कामे करण्यात येणार आहेत, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
टेल्को रस्त्यावरील गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौकापर्यंतचा सव्वा किलोमीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण आणि विद्युत अशी कामे केली जाणार आहेत. रस्त्याचे काम झाल्यानंतर वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केला.