केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून यात मुलींनी बाजी मारली आहे. दिल्लीमधील इरा सिंघल ही देशात पहिली आली आहे, तर पुण्याची अबोली नरवणे राज्यात पहिली आली असून ती देशात ७८ व्या स्थानावर आहे. राज्यातील सुमारे शंभर उमेदवारांची निवड झाली आहे. मात्र, पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील साधारण ४ उमेदवारांना स्थान मिळाले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या वर्षी निकालात मुलींनी बाजी मारली असून पहिल्या चारही स्थानावर मुली आहेत. दिल्ली येथील इरा सिंघल ही उमेदवार देशात पहिली आली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर केरळ येथील रेणू राज आहे. दिल्ली येथील निधी गुप्ता हिने तिसरा, तर वंदना राव हिने चौथा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रात या वर्षी पुण्याच्या अबोली नरवणे हिने बाजी मारली आहे.
गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच राज्यातील जवळजवळ शंभर उमेदवारांची या परीक्षेत निवड झाली आहे. या वर्षी राज्यातील निवड झालेल्या उमेदवारांची संख्या वाढली असली, तरी पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवार कमी दिसत आहेत. पहिल्या पन्नासमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराची निवड झालेली नाही. पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील ४ उमेदवार आहेत.
प्रशासकीय सेवा, विदेश सेवा, पोलीस सेवा आणि केंद्रातील अ आणि ब दर्जाच्या सेवांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. डिसेंबर २०१४ मध्ये मुख्य परीक्षा झाली होती, तर एप्रिल ते जून या कालावधीत मुलाखती झाल्या. या वर्षी १ हजार ३६४ जागांसाठी १ हजार २३६ उमेदवारांची निवड करण्यात आली असून २५४ उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. या परीक्षेतून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून १८० उमेदवारांची प्रशासकीय सेवेसाठी, ३२ उमेदवारांची विदेश सेवेसाठी, १५० उमेदवारांची पोलीस सेवेसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र शासकीय सेवेतील अ दर्जाच्या पदांसाठी ७१० उमेदवारांची तर ब दर्जाच्या पदांसाठी २९१ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
परीक्षेचे स्वरूप
पूर्व परीक्षेला बसलेले उमेदवार – ४ लाख ५१ हजार
मुख्य परीक्षेसाठी निवड झालेले उमेदवार – १६ हजार ९३३
मुलाखतीसाठी निवड झालेले उमेदवार – ३ हजार ३०३
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पुण्याची अबोली नरवणे पहिली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. महाराष्ट्रात या वर्षी पुण्याच्या अबोली नरवणे हिने बाजी मारली आहे.
First published on: 05-07-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam aboli naravane