मुंबई आणि ठाणे परिसरात आढळून येत असलेल्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बालकांच्या प्रकृतीबाबत खबरदारीचे आवाहन राज्य सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. ज्या बालकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांच्यासाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले असून कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता पालकांनी मुलांना गोवरची लस द्यावी, असेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा- किल्ले सिंहगड परिसर अतिक्रमण वेढ्यातून मुक्त; वनविभागाची कारवाई
राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, की गोवर रुबेला लसीचा डोस चुकलेल्या ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लसीकरण राहिलेल्या बालकांसाठी अभियान स्वरूपात विशेष लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. गोवर रुबेला लशीची मात्रा चुकलेल्या बालकांची जिल्हा आणि महापालिका निहाय यादी करण्यात आली आहे. या बालकांसाठी विशेष तसेच नियमित सत्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक गोवर रुग्णाला जीवनसत्त्व ‘अ’ च्या दोन मात्रा देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. गोवर हा आजार दुर्लक्ष केल्यास गुंतागुंतीचा होण्याची शक्यता असते, त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन डॉ. आवटे यांनी केले आहे. मागील चार वर्षातील सर्वाधिक म्हणजे २६ गोवर उद्रेक यंदा राज्यात पहायला मिळाले आहेत. त्यांपैकी १४ मुंबईत, सात भिवंडीत आणि पाच मालेगाव महापालिका क्षेत्रात आहेत.
हेही वाचा- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आता मंजूर प्रकल्पांनाच अनुदान
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळणाऱ्या या आजारात ताप,खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही लक्षणे आढळतात. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते.