पुणे: उन्हाळ्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याने रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार देशभरातील रुग्णालयांची तपासणी मोहीम तातडीने हाती घेतली जाणार आहे.
राज्यांचे आरोग्य विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात ही मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात रुग्णालयांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. रुग्णालयांचे सर्वसमावेशक अग्निसुरक्षा ऑडिट, प्रत्यक्ष तपासणी करण्याचा यात समावेश आहे. त्यात फायर अलार्म, फायर स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रंट्स आणि फायर लिफ्ट्ससह अग्निरोधक यंत्रणा यांची तपासणी केली जाईल.
हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?
याचबरोबर विद्युत भार लेखा परीक्षण करण्यात येईल. अपुऱ्या विद्युतभार क्षमतेमुळे निर्माण होणार्या समस्यांचे निराकरण करणे, रुग्णालयांनी नियमितपणे, विशेषत: नवीन उपकरणे जोडताना अथवा अतिदक्षता विभागात उपकरणांची जागा बदलताना विद्युत भार लेखा परीक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे या बाबी तपासून त्रुटी तत्काळ दूर करण्यास रुग्णालयांना बजावण्यात येईल. रुग्णालयांनी अग्निशमन विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला
आगीची दुर्घटना टाळण्यासाठी…
- अग्निशामक प्रणाली कार्यक्षम आहे काय याची काळजी घ्यावी.
- सुरक्षा उपकरणांची नियमित देखभाल व दुरुस्ती करावी.
- रुग्णालयाच्या वीज वापराचे मूल्यमापन करण्यासाठी, विशेषत: अतिदक्षता विभागात वर्षातून दोनदा विद्युत भार लेखा परीक्षण करणे.
- ऑक्सिजन टाक्या अथवा ऑक्सिजन पाईप असलेल्या भागात, धूम्रपान प्रतिबंधक धोरणांची कठोर अंमलबजावणी करणे आणि उष्णतेच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवणे.
- संपूर्ण रुग्णालयात, विशेषत: रुग्णांच्या खोल्या, मधली जागा आणि सार्वजनिक भागात फायर स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्म बसविणे.
- रुग्णांची काळजी घेण्याच्या विभागातील ज्वलनशील वस्तू काढून त्या जागी पेट न घेणाऱ्या वस्तू ठेवणे.
- महत्वाच्या विभागांमध्ये सहज उपलब्ध होईल अशी स्वयंचलित पाणी फवारणी प्रणाली बसवणे.
- नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ मध्ये नमूद केलेल्या नवीन अग्निसुरक्षा मानकांचे पालन करणे.