पिंपरी-चिंचवड: लघुशंकेचे शिंतोडे अंगावर पडल्याने एकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना पिंपरी- चिंचवडच्या वाकड परिसरात घडली आहे. घटनेत गंभीर जखमी झालेल्या राहुल कचरू घेवंदे चा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात हत्या केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश कलाटे आणि मारुती गुंडेकर अशी गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भुमकर चौकात मोकळ्या मैदानात आरोपी यश कलाटे आणि मारुती गुंडेकर हे लघुशंका करण्यासाठी थांबले होते. तेव्हाच त्यांच्या शेजारी राहुल कचरू घेवंदे हा देखील लघुशंका करत होता. घेवंदे च्या लघुशंकेचे शिंतोडे आरोपींच्या पायावर पडले. यावरून राहुल घेवंदे ला यश कलाटे आणि मारुती गुंडेकर यांनी लाथा बुक्क्यांनी पोटात मारहाण केली.

घटनेनंतर आरोपींनी तिथून त्यांनी पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुलला तेथील मुलाने पाहिले. याबाबतची माहिती राहुलच्या पत्नीला दिली. पत्नीने तात्काळ घटनास्थळी येऊन रिक्षातून पतीला रुग्णालयात नेले. परंतु, दोन दिवसाच्या उपचारानंतर राहुलचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.