पुणे : अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (युएसडीए) परराष्ट्र सेवा विभागाने भारतात २०२४-२५ मध्ये साखर उत्पादन ३५५ लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशात सर्वदूर झालेल्या दमदार मोसमी पावसामुळे या पूर्वीच्या अंदाजात दहा लाख टनांनी वाढ केली आहे.
युएसडीएने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या अर्ध वार्षिक साखर अंदाजात म्हटले आहे, देशात सर्वदूर नैऋत्य मोसमी पाऊस चांगला पडला. विशेषकरून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे उसाची वाढ चांगली झाली आहे, साखर उताराही चांगला राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथेनॉलकडे साखर वळविण्यापूर्वी एकूण साखर उत्पादन ३५० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. युएसडीने यापूर्वीच्या अंदाजात ३४० ते ३४५ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला होता.
हेही वाचा >>> पुणे: दौंडमध्ये महायुतीला धक्का? माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संपर्कात
मागील वर्षी पाण्याचा तुटवडा भासल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र काहिसे कमी असले तरीही प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनात एक टक्का वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात सुमारे ४१८० लाख टन उसाचे गाळप झाले होते. चालू वर्षात देशात एकूण २९० लाख टन साखरेचा उपयोग होईल. केंद्र सरकारने अद्याप इथेनॉल निर्मितीसाठी किती साखरेचा वापर केला जाईल. साखर निर्यातीला परवानगी असेल की नाही, या बाबत धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे साखर कारखानदारही सध्या संभ्रमात आहेत.
हेही वाचा >>> शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ९० लाखांची फसवणूक
दरम्यान, इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएसनने (इस्मा) देशात यंदाच्या गळीत हंगामात एकूण साखर उत्पादन ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा गाळपासाठी ५६.०४ लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे.
साखर उतारा वाढणार
यंदाच्या पावसाळ्यात साखर उत्पादक राज्यांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे गाळपासाठी कमी क्षेत्र उपलब्ध असले तरीही प्रतिहेक्टर ऊस उत्पादन आणि साखर उतारा चांगला राहील. त्यामुळे देशात एकूण साखर उत्पादन ३३५ ते ३४० लाख टनांपर्यंत होऊ शकेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले.