लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘आजचे जग वेगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा सुविधांमध्ये परिवर्तीत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर सर्व स्तरावर केला जात आहे. अशावेळी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातही ‘एआय’तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@ ५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध विभागांच्या प्रमुखांचा सहभाग असलेली दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत व्हिजन@ ५० उपक्रमाबद्दल आयोजित चर्चेत ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यावेळी उपस्थित होते.

शहर परिवर्तन कार्यालयासाठी नियुक्त पॅलेडियम संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी गेल्या दोन महिन्यांपासून व्हिजन @ ५० उपक्रमाअंतर्गत विविध भागधारकांसोबत केलेल्या गटचर्चांमधून आलेल्या प्राथमिक निरीक्षणांवर चर्चा करण्यात आली.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘शहराची संस्कृती जपत कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्रात शहराचा सर्वार्थाने विकास साधण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असताना शहरातील सर्व घटकांचे मत विचारात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने चर्चासत्रे आणि संवादसत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे प्राप्त सूचना आणि माहितीचा एकत्रित अंतर्भाव करून महापालिका स्वतंत्र आराखडा तयार करणार आहे. शासन तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील यामध्ये अंतर्भाव असणार आहे. त्यानुसार आवश्यक धोरणे आखून त्याप्रमाणे नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका कार्यवाही करणार आहे. त्यातून नव्याने विविध उपक्रम आणि योजना विकसित केल्या जाणार आहेत’.

Story img Loader