पुणे : राज्यातील १०० गावांमध्ये भारत फोर्ज कंपनीकडून सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत विविध विकासकामे केली जात आहेत. या गावांमध्ये पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि जीवनमान उंचावणे यासाठी काम केले जात आहे. या माध्यमातून या गावांचे रूप पालटू लागले आहे. आता कंपनी या गावांमध्ये शेतीत कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करणार आहे.

भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती दिली. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी आणि कंपनी सामाजिक दायित्व विभागाच्या प्रमुख डॉ. लीना देशपांडे आदी उपस्थित होते. बाबा कल्याणी म्हणाले की, कंपनीकडून १०० गावांमध्ये मागील काही वर्षे विकासाचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यातून या गावांचे उत्पन्न वाढले आहे. दररोज आपण कृत्रिम प्रज्ञेचा उल्लेख आपण दररोज ऐकत आहोत. यामुळे कृत्रिम प्रज्ञेचा वापर शेतीत करण्याचा प्रयोग केला जाणार आहे. नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

खेड्यातून शहरात होणारे स्थलांतर कमी व्हावे, यासाठी गावांचा विकास होऊन तेथे उत्पन्नाच्या संधी निर्माण व्हायला हव्यात. या हेतूने कंपनीकडून १०० गावांमध्ये काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये शहरात होणारे स्थलांतर कमी झाले आहे. तर काही गावांमध्ये शहरातून लोक परत येऊन शेती करीत आहेत. कंपनीने नऊशेहून अधिक महिला उद्योजकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले आहे, असेही कल्याणी यांनी नमूद केले.

हेही वाचा : विश्लेषण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सची का वाटते सगळ्यांनाच भीती? काय आहे ब्लेचली जाहीरनामा?

शिक्षणासह कौशल्य विकासावर भर

भारत फोर्जने शैक्षणिक उपक्रमाद्वारे ३४ हजार ५८९ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. याचबरोबर ३ हजार तरुणांना कौशल्य विकासाद्वारे रोजगारक्षम बनविले आहे. गावांमध्ये शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची सुविधा, आरोग्य, स्वच्छता यासाठी कामे केली जात आहेत. त्यामुळे आगामी काळात या गावांतील लोकांच्या उत्पन्नात आणखी वाढ होईल, असे कल्याणी यांनी नमूद केले.

Story img Loader