पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुणाळीला सुरुवात झाली असतानाच भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा’ अशा आशयाचा मजकूर प्रसारित केला आहे. त्याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस उमेदवाराचा त्यांच्या पक्षातील नेत्यांवर विश्वास नसल्यामुळेच त्यांच्यावर भाजप नेत्यांची छायाचित्र वापरण्याची वेळ आल्याची टीका बापट यांनी केली.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघातील लढत एकतर्फी होणार नसून ती चुरशीची होईल, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने या दोन्ही उमेदवारांकडून निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून प्रचार करताना दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरले असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेस पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. गौरव बापट यांनीही छायाचित्र वापरण्यास आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा – मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर आणि नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पक्षाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरण्याची वेळ आली आहे. यावरून त्यांची पराभवाची मानसिकता दिसून येते आहे. स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच नेत्यांवर विश्वास असता, तर अशा पद्धतीचे बालीश चाळे झाले नसते, असे गौरव बापट यांनी सांगितले.
हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावर भाजपचे चारशेहून अधिक खासदार निवडून येतील. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे यापुढे जोमाने प्रचार केला जाईल, असेही बापट यांनी सांगितले.
माझ्या अधिकृत समाजमाध्यमातून छायाचित्र असलेला मजकूर प्रसारित झालेला नाही. दिवंगत खासदार गिरीश बापट सर्वांचे होते. कार्यकर्त्यांनी तशा आशयाचा मजकूर टाकला असेल आणि त्याची तशी भावना असेल तर त्यामध्ये गैर काही नाही. – रवींद्र धंगेकर, काँग्रेस, उमेदवार