पुणे : मालमत्ता करातील चाळीस टक्के सवलत पुनर्स्थापित करण्याचा शासन निर्णय महापालिका निवडणुकांआधी झाला नाही तर, नागरिकांना आगामी महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ अस्त्राचा वापर करावा लागेल, असा इशारा सजग नागरिक मंचाच्या सभेत देण्यात आला.मिळकतकरातील चाळीस टक्के सवलत टिकविण्यासाठी नागरिकांनी काय करावे, या विषयावर सजग नागरिक मंचाची सभा आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी वेलणकर यांनी हा इशारा दिला.

मिळकतकरातील सवलत रद्द होण्यास महापालिका आयुक्तांची या संदर्भात शासनाला केलेली शिफारस कशी कारणीभूत आहे आणि या बाबतीत सर्वच राजकीय पक्ष कसे अपयशी ठरले याचे विवेचन माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे विवेक वेलणकर यांनी केले.वेलणकर म्हणाले,की एक कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या ४७५ थकबाकीदारांची १२०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेली महापालिका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांची ५० वर्षे उपलब्ध असलेली चाळीस टक्के सवलत बिनदिक्कतपणे काढून घेते हे संतापजनक आहे.

हेही वाचा : पुणे जिल्हा बँकेच्या कायम कर्मचाऱ्यांना ; सरसकट दहा टक्के पगारवाढ

ही सवलत पुनर्स्थापित करण्यासाठी आता नागरिकांनाच लढा उभारून राजकीय पक्षांवर दडपण आणावे लागेल. यासाठी शहरातील जास्तीतजास्त गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सोसायटीच्या दारावर मालमत्ता करातील चाळीस टक्के सवलत पुनर्स्थापित करण्याचा शासन निर्णय महापालिकेच्या निवडणुकांआधी झाला नाही तर या निवडणुकीत आम्ही कोणत्याच राजकीय पक्षाला मत न देता ‘नोटा’ ला मतदान करणार आहोत,असे फलक लावावेत, असे आवाहन विवेक वेलणकर यांनी केले.पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी फेडरेशन मार्फत हा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे लावून धरण्याचा, तसेच वेळप्रसंगी न्यायालयाचा मार्ग स्वीकारण्याचा इरादा व्यक्त केला. जुगल राठी यांनी आभार मानले.

Story img Loader