पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना मोहजालात अडकवण्यासाठी ज्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला, तो वायुदलातील शिपाई निखिल शेंडे याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सखोल तपासासाठी कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात म्हटले आहे.
पाकिस्तानी मोहजालात (हनीट्रॅप) अडकलेले डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबत एटीएसने विशेष न्यायालयात अहवाल सादर केला आहे. गरज भासल्यास कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येईल तसेच याबाबत त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची संमती घेण्यात येईल, असे एटीएसने या अहवालात म्हटले आहे. कुरुलकर यांचा लॅपटॉप आणि मोबाइल संच एटीएसच्या ताब्यात असून त्या आधारे तांत्रिक तपास करण्यात येत आहे.
कुरुलकरांना मोहजालात अडकवणारी पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिचा मोबाइल क्रमांक नागपूरमधील वायूदलातील शिपाई निखिल शेंडे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. झारा हिचा मोबाइल क्रमांक कुरुलकर यांनी ‘ब्लॉक’केला होता. त्यानंतर तिने दुसऱ्या क्रमांकावरून कुरुलकर यांना ‘तू मला ब्लॉक का केले’ असा संदेश पाठवला होता. हा क्रमांक शेंडे याचा असल्याचे उघड झाल्यानंतर एटीएसने त्याला नोटीस बजावली. शेंडे याचा पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. शेंडे सध्या बंगळूरुत नियुक्तीस असून, वायुदलातील अधिकाऱ्यांकडून त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
येरवडा कारागृहात रवानगी कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (१६ मे) संपली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मंगळवारी दिले. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यांना कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहे. कारागृहात घरचे जेवण मिळावे, ही त्यांची विनंती न्यायालयाने अमान्य केली. मात्र, त्यांना मधुमेहाची औषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.