लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वाहतूककोंडीने श्वास कोंडलेल्या पुणेकरांसाठी नवे वर्ष हे कोंडीमुक्त असणार आहे. त्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन वर्षात वाहतूककोंडी सोडविण्यावर भर देण्याचा संकल्प केला आहे. शहरातील प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे (सिग्नल) सुसूत्रीकरण केले जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (रडार बेस टेक्नोलॉजी) करण्यात येणार आहे. सध्या शहरात सध्या १५०० सीसीटीव्ही कॅमेरे असून, २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने बेशिस्त वाहनचालकांवरही नजर असणार आहे.
शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्याकडे पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. ‘नवीन वर्षात शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. कोंडीची ठिकाणे निश्चित करणे, प्रमुख चौकांतील सिग्नलचे सुसूत्रीकरण, तसेच वाहतूक सुरळीत ठेवून पुणेकरांचा प्रवास सुरक्षित कसा होईल. या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आणखी वाचा-…तर नववर्षाची रात्र कोठडीत, मद्यपी वाहनचालकांना पोलीस आयुक्तांचा इशारा
‘शहराचा विस्तार वाढत आहे. शहरातील सर्व सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याची योजना मांडण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होईल. शहरात सध्या १५०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणखी २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वाहतूककोंडी होणारे प्रमुख चौक, रस्ते, उपरस्ते निश्चित करण्यात आले आहेत. या भागातील कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे,’ असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
‘महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील वाहतूककोंडी, त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यास यापुढील काळात प्राधान्य देण्यात येणार आहे’, असे अमितेश कुमार म्हणाले.
‘रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांतील रस्ते अपघाताची आकडेवारी विचारात घेतल्यास यंदा गंभीर स्वरूपाच्या रस्ते अपघातांची संख्या जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार, मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (रडार बेस टेक्नॉलॉजी) करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत तंत्रज्ञांशी समन्वय साधण्यात आला आहे. एखाद्या भागात वाहतुकीचा वेग किती आहे, वाहतूक सुरळीत आहे का नाही, याबाबतची माहिती समजण्यास मदत होणार आहे. ही माहिती मिळाल्यास पोलिसांना वाहतूककोंडीची ठिकाणे समजू शकतील. त्या माध्यमातून कोंडी हटविणाऱ्या पोलिसांना मदत होईल. -अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
‘मोक्का’तील गुन्हेगारांवर करडी नजर
गेल्या काही वर्षांत पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) शहरातील गुंड टोळ्यांवर कारवाई केली. टोळ्यांमधील ७०० जण जामीन मिळवून बाहेर आले आहेत. काही जण जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. स्थानबद्ध केलेले सराईत कारागृहात बाहेर पडले आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारे, तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्या सराइतांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई वेळोवेळी करून योग्य ती समज देण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. त्यांचे समुपदेशन करणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याच्या सूचना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या आकडेवारीचा आढाव घेतल्यास शहरात यंदा खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. गुंडांवर जरब बसविल्यामुळे गंभीर गुन्हे कमी झाले आहेत, याकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लक्ष वेधले.