डॉ. जयंत नारळीकर आणि शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे शनिवारपासून (१७ नोव्हेंबर) २५ नोव्हेंबर या कालावधीत विविध कलांचा जलसा असलेल्या ‘पुलोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना यंदाचा ‘पु. ल. स्मृती सन्मान’ तर, ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘सबकुछ पुलं’ असे स्वरूप असलेल्या पुलोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात शनिवारी (१७ नोव्हेंबर) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बुधवारी (२१ नोव्हेंबर) ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना कृतज्ञता सन्मान, गुरुवारी (२२ नोव्हेंबर) ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते नारळीकर यांना, शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते फडणीस यांना, शनिवारी (२४ नोव्हेंबर) नाटय़संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते गायिका कौशिकी चक्रवर्ती यांना तरुणाई सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. पुलोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी (२५ नोव्हेंबर) उस्ताद झाकीर हुसेन यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी मंगळवारी दिली. महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी या वेळी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ustad zakir hussain p l memory honor
Show comments