पुणे : दिवाळीनिमित्त घरोघरी केलेल्या स्वच्छतेवेळी जुन्या, मात्र उपयुक्त वस्तूंचे पर्यावरणपूरक संकलन करण्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या वतीने ‘व्ही कलेक्ट’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या सोळा ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात राबविली जाईल. महात्मा गांधी जयंतीपासून (२ ऑक्टोबर) या मोहिमेला प्रारंभ झाला. दिवाळीनिमित्त घरोघरी केल्या जाणाऱ्या स्वच्छतेतून निघणाऱ्या जुन्या, मात्र उपयुक्त वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीसाठी या वस्तूंचे संकलन केले जाणार आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.
ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता परिसरात १२ ऑक्टोबर, वाघोली, नगर रस्ता, येरवडा,कळस आणि धानोरी मध्ये १३ ऑक्टोबर, तर कोथरूड, बावधन, वारजे आणि कर्वेनगर भागात चौदा ऑक्टोबर रोजी वस्तूंचे संकलन फिरत्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष वाहनांची सुविधा ‘स्वच्छ’ संस्थेकडून करण्यात आली आहे. नागरिकांनी जुन्या वस्तू आणि ई-वेस्ट या उपक्रमात जमा करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे यांनी केले आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाअंतर्गत ९५ टन जुन्या वस्तूंचे संकलन करण्यात आले होते. या वस्तूंचा पुनर्वापर करण्यात आला होता. जुने कपडे, पुस्तके, भांडी, इलेक्ट्राॅनिक उपकरणे, शोभेच्या वस्तू कचरा वेचक आणि अन्य गरजू लोकांपर्यंत रास्त दरात पोहोचविण्यात आल्या होत्या.