मध्यमवर्गीयांची सुखदु:खे रंजक पद्धतीने मांडत जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान सोपेपणाने उलगडणारे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे निवडक साहित्य अनुवादाच्या माध्यमातून आता इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. बडोदा येथील विक्रांत पांडे यांनी वपुंच्या काही पुस्तकांचा अनुवाद केला असून लवकरच ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
कादंबरी आणि कथालेखनाद्वारे ठसा उमटविणारे व. पु. काळे यांचे मराठी साहित्यामध्ये स्वतंत्र स्थान आहे. या साहित्यनिर्मितीला त्यांनी कथाकथनाची जोडही दिलेली होती. वपुंची गाजलेली पुस्तके इंग्रजी वाचकांपर्यंत नेण्यासाठी बडोदा येथील ‘टीन एज’ या खासगी विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या विक्रांत पांडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ‘पार्टनर’ या गाजलेल्या कादंबरीसह ‘आपण सारे अर्जुन’, ‘कर्मचारी’ आणि ‘ही वाट एकटीची’ ही वपुंची पुस्तके अनुवादित केली आहेत. ही पुस्तके हार्पर कॉलिन्स या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित होणार आहेत. पांडे यांनी यापूर्वी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांची ‘क्रौंचवध’ आणि ‘अश्रू’ ही पुस्तके इंग्रजीमध्ये अनुवादित केली आहेत.
याविषयी विक्रांत पांडे म्हणाले, वपुंच्या लेखनातील घटना या भारतामध्ये कोठेही घडताना दिसतात. त्यामुळेच या लेखनाचा इंग्रजी अनुवाद असणे महत्त्वाचे वाटले. वपुंचे लेखन शब्दप्रधान असल्याने त्याचा अनुवाद करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. शब्दांचा अनुवाद केला तरी भावनांचा अनुवाद करता येत नाही. या लेखनाचा भावार्थ जपत अनुवाद करण्याचे काम केले आहे. वपुंच्या लेखनातील काही शब्दांचा अर्थ केवळ मराठीत समजतो, मात्र त्यामागील भावना इंग्रजीमध्ये मांडली आहे.

Story img Loader