पिंपरी महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील पदे एकापाठोपाठ रिक्त होत असताना तेथे सक्षम अधिकारी मात्र मिळत नसल्याने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची डोकेदुखी कायम असल्याचे दिसून येत आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली. पर्यायी अधिकारी न मिळाल्याने कदम यांच्याकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दुसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनमान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. पूर्णवेळ शहर अभियंता पाहिजे म्हणून शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्याप तो मिळत नसल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून महावीर कांबळे यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गायकवाड निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यांच्याकडे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या मुख्य अधीक्षकपदाची जबाबदारी देखील आहे. या दोन्ही पदांसाठी नवा कारभारी हवा आहे. नगरसचिव दिलीप चाकणकर देखील निवृत्त होत आहेत. जकात अधीक्षक अशोक मुंढे, करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार शासनाच्या सेवेत परतण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत. तेथे पर्याय आवश्यक आहेत. पाडुरंग झुरे यांच्याकडे सहआयुक्तपदाचा, सतीश पवार यांच्याकडे कायदे सल्लागारपदाचा तर उत्तरा कांबळे यांच्याकडे माध्यमिक विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. झुरे यांना मुख्यालयात आणण्याचे संकेत असल्याने त्यांच्याकडील ड प्रभागाची जबाबदारी काढण्यात येईल. त्यामुळे तेथेही कोणाची तरी वर्णी लावावी लागणार आहे. याशिवाय, अनेक सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंते व अन्य अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत.
यासंदर्भात, आयुक्तांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसते. लालफितीच्या कारभारामुळे हा उशीर होतो आहे की अप्रत्यक्षपणे आयुक्तांची अडवणूक केली जात आहे, याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.