पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यातील लढत चुरशीची झाली. वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघात उपस्थिती लावली. प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार जगदीश मुळीक यांच्या नाराजी नाट्यानंतर वडगाव शेरी मतदारसंघ निकालाकडे सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वडगाव शेरीतील निवडणूक सुरुवातीपासून चर्चेची ठरली. माजी आमदार बापू पठारे, विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी रणनीती आखली. कार्यकर्ते, यंत्रणा उभी केली. निवडणूक जाहीर होताच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जगदीश मुळीक यांनी प्रयत्न केले. महायुतीत वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या वाट्याला आला. मुळीक यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बंडाची तयारी केली. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुळीक यांची जातीने समजूत काढली. मुळीक यांची नाराजी दूर झाली. त्यांचे योग्य ते राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्दही देण्यात आला. मात्र, मुळीक यांची नाराजी निकालावर परिणाम करण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी चर्चा वडगाव शेरी मतदारसंघात आहे.
हेही वाचा – कंत्राटी कामगारांना कार्यालयात मोबाइल वापरण्यास बंदी, पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय
हेही वाचा – पिंपरी : मतमोजणीनिमित्त उद्या ‘या’ भागातील वाहतुकीत बदल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांमधील लढत प्रतिष्ठेची ठरली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारात हजेरी लावली. जातीने त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. येरवडा, वडगाव शेरी, खराडी, लोहगाव, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, विमाननगर भागातील नात्यागाेत्यांवर राजकीय समीकरणे बांधण्यात आली. नवमतदारांचा टक्का यंदा वाढला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत वडगाव शेरी मतदारसंघात कल्याणीनगर अपघात प्रकरण चर्चेत राहिले. कल्याणीनगर अपघात प्रकरणाची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आली. कल्याणीनगर, खराडी भागातील उच्चभ्रू मतदारांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. कष्टकरी, श्रमिक या मतदारसंघात राहायला आहेत. विमानगर, खराडी भागात माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने या भागात परगावातून नागरिक वास्तव्यास आले आहेत. नवमतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.